Automobile retail sales in India – सध्या व्याजदर उच्च पातळीवर असूनही ग्राहकांची वाहन खरेदी करण्याची क्षमता कमी झालेली नाही. अशा अवस्थेत फेब्रुवारी महिन्यात किरकोळ वाहन विक्री म्हणजे वितरकांनी ग्राहकांना केलेली वाहन विक्री 13 टक्क्यांनी वाढली आहे. या महिन्यांमध्ये प्रवासी वाहन विक्रीबरोबरच दुचाकी वाहन विक्री वाढल्यामुळे एकूणच वाहन विक्री वाढण्यास मदत झाली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात 20,29,539 वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या केवळ 17,94,866 इतकी होती.
फेब्रुवारी महिन्यात प्रवासी वाहन विक्री 12 टक्क्यांनी वाढून 3,30,107 युनिट झाली. गेल्या वर्षी ही संख्या 2,93,803 इतकी होती. या संघटनेचे अध्यक्ष मनीषराज सिंघानिया यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात जेवढी विक्री झाली तेवढी आतापर्यंत कधीच झाली नव्हती.
विविध वाहन कंपन्यांनी ग्राहकांना अपेक्षित असलेली वाहने बाजारात सादर केल्यामुळे व्याजदर जास्त असूनही वाहनांची विक्री वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात दुचाकी वाहन विक्री 13 टक्क्यानी वाढून 14,39,523 युनिट एवढी झाली. गेल्या वर्षी ही संख्या केवळ 12,71,073 युनिट एवढी होती.
ग्रामीण भागातून दुचाकीलाा मोठ्या प्रमाणात मागणी येत असल्यामुळे दुचाकीची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर या काळात लग्नसराई चालू आहे. त्यामुळेही दुचाकीची विक्री वाढत आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/stock-market-the-speed-of-index-growth-is-slow-but-will-continue-to-record-levels/
फेब्रुवारी महिन्यात तीन चाकी वाहनांची विक्री 24 टक्क्यांनी, ट्रॅक्टरची विक्री 11 टक्क्यांनी तर व्यावसायिक वाहनांची विक्री पाच टक्क्यांनी वाढली आहे. एकूण परिस्थिती पाहता आगामी काळातही विक्री वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जूनमध्ये व्याजदरात कपात झाल्यानंतर वाहन विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.