T20 World Cup 2024 (Super 8, IND vs AUS) : सलग दोन सामने जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला सोमवारी टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मधील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवायचे आहे, तर अफगाणिस्तानविरूध्द उलटफेरचा बळी ठरलेल्या ऑस्ट्रेलियासाठी आजचा सामना हा ‘करो या मरो’ असा असणार आहे.
टी-20 विश्वचषक 2024 मधील सुपर-8 फेरीतील भारताचा शेवटचा सामना सोमवारी रात्री 8 वाजता सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतासाठी या सामन्यातील विजय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच ऑस्ट्रेलियासाठीही महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तानकडून शेवटचा सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका आहे.
भारतीय संघाला सलग तिसऱ्या विजयासह गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठायची आहे. तर 2021 चा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ, जो शनिवारी रात्री अफगाणिस्तानकडून पराभूत झाला, तो भारताविरूध्दचा सामना गमावताच स्पर्धेतून बाहेर पडेल. या सामन्यात कांगारूंना पराभूत करून, रोहित शर्मा आणि कंपनीला त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा केवळ कमकुवत करायच्या नाहीत तर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा बदलाही घ्यायचा आहे.
अफगाणिस्तानकडून हरल्यानंतर आता विजयासोबतच ऑस्ट्रेलियालाही प्रार्थना करावी लागेल की राशिद खानचा संघ सोमवारी रात्री बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभूत होऊ दे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये अनेकदा ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होणारा भारतीय संघ आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला या स्पर्धेतून लवकर दूर करण्याचा प्रयत्न करेल. सुपर-8 मध्ये भारताने अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला आहे. आता भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे.
Afghanistan’s unforgettable win over Australia keeps the race for semi-final spots from Group 1 wide open 👊
👉 https://t.co/5r9YRQxCRY pic.twitter.com/Uunw28ab1R
— ICC (@ICC) June 23, 2024
…तर अफगाणिस्तान उपांत्य फेरीत
टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजयरथावर स्वार होत आहे. भारताने सुपर-8 मध्येही सलग 2 सामने जिंकले आहेत आणि उपांत्य फेरीसाठी जवळपास एक जागा राखून ठेवली आहे. पण, सोमवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून टीम इंडिया अंतिम-4 साठी पूर्णपणे पात्र ठरेल. दुसरीकडे, ग्रुप 1 मध्ये समाविष्ट असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने 2 सामने खेळले असून प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. अशा स्थितीत गट-1 मधील उपांत्य फेरीची शर्यत अतिशय रोमांचक बनली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या निकालावर बरेच काही अवलंबून आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला तर अफगाणिस्तान संघ दोन विजय आणि एक पराभवासह उपांत्य फेरीत जाईल.
भारत-ऑस्ट्रेलिया हेड टू हेड रेकॉर्ड…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 19 सामने जिंकले आहेत, तर कांगारू संघाने 11 सामने जिंकले आहेत. हेड टू हेड रेकॉर्ड पूर्णपणे भारतीय संघाच्या बाजूने दिसत आहे.
विश्वचषकात कोणाचे राहिले आहे वर्चस्व…
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या विक्रमांबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांमध्ये 5 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 3 सामने तर ऑस्ट्रेलियाने 2 सामने जिंकले आहेत.
पांड्या टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद …
भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टी-20 विश्वचषकात भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सुपर-8 मध्ये बांगलादेशविरूध्दच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही चांगली सुरुवात केली होती. हे देखील भारतासाठी चांगले संकेत आहे. याशिवाय हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरीही दिलासा देणारी आहे. बांगलादेशविरुद्ध एकवेळ भारताने 3 चेंडूत दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर हार्दिकने अर्धशतक झळकावत भारताला 200 धावांपर्यंत पोहोचवले. यानंतर त्याने गोलंदाजीतही 1 महत्वपूर्ण विकेट घेतली. तर शिवम दुबेनेही महत्त्वाची खेळी करत टीकाकारांना शांत केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत रिव्हर्स फटके मारताना अनेकदा विकेट गमावत आहे आणि त्याला ही कमतरता दूर करावी लागेल.
कॅरेबियन खेळपट्ट्यांवरही कुलदीप यादवची फिरकी प्रभावी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही कुलदीप मधल्या षटकांमध्ये भारताचे ट्रम्प कार्ड ठरू शकतो. भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण आतापर्यंत कोणत्याही संघाविरुद्ध प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरले आहे. अनुभवी गोलंदाज बुमराहने या स्पर्धेत 10 तर युवा गोलंदाज अर्शदीपने 12 विकेट्स घेतल्या आहेत.
विराट आणि झम्पा यांच्यात होणार टक्कर…
अफगाणिस्तानविरुद्धच्या फलंदाजीच्या ‘फ्लॉप शो’नंतर ऑस्ट्रेलियाला बरीच सुधारणा करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाची खराब क्षेत्ररक्षणाची कामगिरीही आश्चर्यकारक होती. अॅडम झम्पा आणि कोहली यांच्यात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 12 डावांमध्ये सामना झाला आहे. यामध्ये कोहलीने 74 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर लेग स्पिनरने त्याला तीनदा आपला बळी बनवले आहे. अॅडम झम्पा याने चालू स्पर्धेत 6 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत.
हवामान अहवाल काय सांगतो?
हा सामना सेंट लुसिया येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. मात्र, हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. या सामन्यावर काळे ढगाचे सावट आहे. भारताचे आतापर्यंतचे सर्व सामने सकाळीच झाले आहेत. हवामान अहवालानुसार, सकाळी पावसाची 55 टक्के शक्यता असून तापमान 32 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे खेळ खराब होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला होणार फायदा ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी एक गुण जमा होईल. भारतीय संघ सध्या ग्रुप-1 मध्ये चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे. एका गुणासह भारताचे पाच गुण होतील आणि संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात तीन गुण असतील. सुपर-8 मधील त्याचा हा शेवटचा सामना असेल. हा सामना रद्द होताच, अफगाणिस्तानला बांगलादेशचा पराभव करून चार गुणांसह आणि चांगल्या नेट रनरेटसह उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल.
टी-20 विश्वचषक 2024 साठी दोन्ही संघ…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.