नवी दिल्ली – भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या अभिनंदनाच्या जाहीरातीत चुकुन भारताच्या झेंड्याऐवजी चीनचा झेंडा टाकणे तामिळनाडूतील द्रमुक पक्षाला चांगलेच अडचणीचे ठरले आहे. या पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांचा आज वाढदिवस होता.
त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. भारतीय जनता पार्टीनेही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र भाजपच्या या शुभेच्छा जरा राजकीय स्वरूपाच्या आहेत. त्याचे कारण पक्षाने स्टॅलीन यांना चीनी भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चीनी झेंडा दर्शवणाऱ्या जाहीरातीचा जास्तीत जास्त लाभ घेत द्रमुकला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो आहे.
आताही स्टॅलीन यांच्या संदर्भात एक्सवरील पोस्टमध्ये भाजपने म्हटले आहे की तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना त्यांच्या आवडत्या भाषेत शुभेच्छा. त्यांनी आरोग्य संपन्न राहावे आणि दीर्घायुषी व्हावे.