नागपूर – भारतीय संघाविरुद्धची भारतातच होत असलेली चार कसोटी सामन्यांची मालिका ऍशेस कसोटी मालिकेपेक्षाही जास्त मोठी व प्रतिष्ठेची आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ याच्यासह अन्य क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. भारतीय संघाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत करणे वाटते तीतके सोपे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हे पाहिले आहे.
#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण
त्यांच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांवर वर्चस्व राखणे म्हणजे सर्वात मोठे आव्हान असते. भारतीय संघाला भारतात गेल्या 18 वर्षे पराभूत करु शकलेलो नाही. इंग्लंडविरुद्धची ऍशेस कसोटी मालिका महत्वाची असतेच मात्र, भारताविरुद्धची कसोटी मालिका त्यापेक्षाही जास्त महत्वाची आहे, असे स्मिथ याने म्हटले आहे.
भारतीय संघाकडे जगातील सर्वात अव्वल फिरकी गोलंदाज आहेत. त्यातही रवीचंद्रन अश्विन हे त्यांचे सर्वात प्रभावी अस्त्र आहे. आजवर त्याने आमच्याविरुद्ध सातत्याने अफलातून कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हालाही त्याची गोलंदाजी अत्यंत काळजीपूर्वक खेळावी लागणार आहे. फलंदाजाला तो कोणतीही संधी देत नाही व हेच त्याच्या गोलंदंजीतील महत्वाचे वैशिष्ठ्य आहे, असेही त्याने म्हटले आहे. स्मिथच्या मताला डेव्हीड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनीही दुजोरा दिला आहे.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर करंडक चार कसोटी सामन्यांची मिलाका होत आहे. यातील पहिला सामना येत्या गुरुवारपासून येथील जामठा स्टेडियमवर सुरू होत असून त्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव सुरु केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतात भारतीय संघाला 2004 साली कसोटी मालिकेत पराभूत करण्याची किमया केली होती. त्यानंतर गेली 18 वर्षे त्यांना भारतात मालिका जिंकता आलेली नाही.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), ऍश्टन ऍगर, स्कॉट बोलॅंड, अलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, पीटर हॅंड्सकॉम्ब, जोश हेजलवूड, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लेबुशेन, नॅथन लॉयन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.