Navneet Rana And Bachu Kadu| अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून बुधवारी नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागील काही दिवसांपासून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. अखेर काल भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करत चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून मतभेद होते. शिंदे गटासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नवनीत राणाच्या उमेदवारीला विरोध केला होता.
शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आणि बच्चू कडू यांनीही राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. याबाबत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, “नवनीत राणा यांना आमचा विरोध कायम राहील. भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन त्यांचे काम केले, आता आम्ही आमचं काम करु. सध्या तरी आम्ही अमरावतीपुरता विचार करु. महायुती आणि विशेषत: भाजपला आमची गरज नसल्याने आता आम्ही पुढील विचार करु, सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याबाबत निर्णय घेऊ.”
“नवनीत राणा यांचा प्रचार अजिबात करणार नाही”
“नवनीत राणा यांनी आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. आमचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत काम करु शकत नाहीत. आम्ही नवनीत राणा यांच्यासाठी काम केले तर आमचा पक्षच अडचणीत येईल. भाजपने त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार अजिबात करणार नाही,” असे बच्चू कडू यांनी सांगितले.
नवनीत राणा यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले होते.
हेही वाचा:
ईडीने जप्त केलेला पैसा गरीबांना परत करणार; पंतप्रधान मोदींचे आश्वासन